शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला. अशातच विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सूरु आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील’, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे.
रामदास कदम यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावत असतात. विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी चांगला कौल महायुतीला दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले आहेत. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत, असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल, अशी अशा रामदास कदम यानिओ यावेळी व्यक्त केली.
रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा..
रामदास कदम बोलताना म्हणाले की, मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील, असे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलंय, त्या पापाचं प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भाजपचा निर्णय मान्य असेल…
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोठी जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, 18 ते 20 तास महाराष्ट्रात जनतेचे काम करणारा मुख्यमंत्री पहिलाच आहे. ते म्हणजे एकनाथ शिंदे. मागच्या वेळी आमचा आकडा कमी असतानाही आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे आम्ही किती मागावे, काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे. आम्हा सर्वांचीच इच्छा आहे की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यांना सुद्धा त्यांचा पक्ष चालवायचा आहे, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कुठलाही मतभेद आमच्यात नसेल, असे रामदास कदम यांनी सांगितले.