पिंपरी : कार्तिकी एकादशी आणि यात्रेची धामधूम सुरू असताना आळंदीत एक तीन वर्षांचा चिमुकला सापडला. त्याच्या पालकांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली. दोन दिवस पोलिसांनी त्याला पालकांप्रमाणे सांभाळले. मात्र, तो हरवला नसून त्याला सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आईच्या नराधम प्रियकराने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत आईचा निघृण खून केला आणि त्याला गर्दीत सोडून दिले. दरम्यान, त्याच्या डोळ्यादेखत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे पोलिसांसमोर दोन दिवस फक्त आई इतकेच बोलणाऱ्या चिमुकल्याला पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले.
जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारूंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२, रा. मु. बहर पो. करूंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या नराधम प्रियकराचे नाव आहे. दिनेश आणि जयश्री हे दोघे वाकड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, जयश्री दिनेशकडे पैशांची मागणी करत असे. तर, दिनेश जयश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दरम्यान, २४ नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास भूमकर चौक, जिंजर हॉटेल येथे कारमध्ये दोघांचे भांडण झाले. यावेळी दिनेश याने लोखंडी हातोडीने घाव घालून तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह कारमधून नेऊन खंबाटकी घाट (खंडाळा) येथे फेकून दिला.
विशेष म्हणजे हे करत असताना जयश्रीचा मुलगा सोबतच होता. दरम्यान, २५ नोव्हेंबरला मुलाला आळंदी येथे वारकऱ्यांच्या गर्दीत सोडले. त्यानंतर रात्री वाकड पोलीस ठाणे गाठून जयश्री हिची बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, जयश्री हिचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता दिनेशवर संशय बळावला. त्याला काळेवाडी येथून ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने खुनाची कबुली दिली
रीलवरून पटली ओळख…
दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात अडचण येत होती. मृतदेह जयश्रीचा असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. मात्र, याबाबत साशंकता होती. दरम्यान, ज्या दिवशी जयश्री हिचा खून झाला त्याच दिवशी तिने सकाळी इन्स्टाग्रामवर एक रिल पोस्ट केली होती. पोस्ट आणि मृतदेह यावरील कपडे सारखेच असल्याने तो मृतदेह जयश्री हिचा असल्याची पोलिसांना खात्री झाल्याचे सूत्रांनी सांगितले.