दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. प्रियंका गांधी यांचा केरळच्या वायनाड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय झाला. पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
प्रियांका गांधी यांनी खासदारकीची शपथ घेताना हातात प्रतीक म्हणून संविधानाची लाल रंगातील कॉपी घेतली होती. गांधी घराण्यातील त्या नववी व्यक्ती आहेत, ज्या संसदेत पोहोचल्या आहेत. लोकसभेत पहिल्या दिवशी प्रियांका गांधी यांनी संविधानाची प्रत हाताl घेऊन शपथ घेतल्याने त्यासुद्धा भाऊ राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसून आलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीने संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्दयाचा त्यांना फायदासुद्धा मिळाला. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसला फारसं यश मिळालं नाही. तरीही राहुल गांधी यांच्याकडून संविधानाचा मुद्दा उचलून धरला जात आहे.
याबरोबरच, प्रियंका गांधी यांच्यासोबत खासदार रविंद्र चव्हाण यांनी शपथ घेतली. रविंद्र चव्हाण हे महाराष्ट्रातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत विजयी झाले. रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून मराठीमधून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांनी देखील हातामध्ये संविधानाची प्रत घेतली होती. रवींद्र चव्हाण यांनी पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला.