मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. तर 233 जागांवर महायुतीने यश मिळवलं आहे. तर 132 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला आहे. दरम्यान मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सस्पेन्स वाढत असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्यातील मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग मिळाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात मंत्रिमंडळाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील रेल्वेच्या अंदाजे एकूण 7,927 कोटींच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पांमुळे विकासाला चालना मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होईल. तसेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील आणि तीर्थक्षेत्र यात्रेकरूंना याचा लाभ होईल. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मन:पूर्वक आभार!…, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप या पदासाठी कुणाची निवड करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. तथापि, इतर नावांचीही चर्चा सुरु झाली आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात यावे म्हणून राज्यभरात भाजप नेत्यांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान, आज दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.
🚆महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात मंत्रिमंडळाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील रेल्वेच्या अंदाजे एकूण ₹7,927 कोटींच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली… pic.twitter.com/e5KVBhDIvp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2024