नाशिक : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं आहे. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत विरोधकांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. असं असताना शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी देखील ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणीची मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.
सुधाकर बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे.
दरम्यान, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना 1 लाख 41हजार 725 मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना 73 हजार 651 मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला 46 हजार 649 मते मिळाली आहेत.
दरम्यान, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे देखील फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहेत. नियमानुसार पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणी होऊ शकते, त्यासाठी शुल्क भरावा लागतो. ही सगळी प्रक्रिया पार पडून फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचं या दोन्ही उमेदवारांचे म्हणणं आहे.
तसेच परळी मतदारसंघामध्ये 140 ते 150 बूथवर मृत लोकांचं मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं आहे. मात्र, अद्याप याबाबत निवडणूक आयोगाने कोणतही उत्तर दिलं नाही, असं राजेसाहेब देशमुख यांनी सांगितलं आहे.