मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील महायुतीचे सहा आमदार निवडून आल्याने त्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. शिवसेनेचे आमश्या पाडवी, भाजपचे रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी
काँग्रेसचे राजेश विटेकर विधानसभेत निवडून आले आहेत. पाडवी हे अक्कलकुवा, दटके नागपूर मध्य, पडळकर जत, बावनकुळे कामठीमधून, तर विटेकर पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
एकाचवेळी दोन सभागृहांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार, या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधान परिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. कारण, विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनी या सहा सदस्यांचे मंगळवारी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.