मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, हा एकच प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरण निर्माण करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा सूर लावला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेत एक गुगली टाकली. त्यामुळे महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकाच्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. पण, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारत एक नवा प्रस्ताव भाजपसमोर मांडला.
महायुती सरकारचे संयोजक पद द्या : एकनाथ शिंदे
मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असं एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच माझा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकाळ्यात पडले आहेत. दरम्यान, भाजपने या प्रस्तावावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याची माहिती मिळत आहे.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपच्या थिंक टँकमधील नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत मान्य असेल, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. कारण कालपर्यंत दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे, कितपत योग्य ठरणार हा प्रश्न निर्माण होत आहे.