पुणे : पुणे पोलीस दलातून एक हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत मेफेड्रोनसह अंमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला आणि गेल्या आठ वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेला लाडका श्वान ‘लिओ’चा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पोलीस दलासह शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लिओने मेफेड्रोनसह अंमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शोकाकुल वातावरणात सलामी गार्डने लिओला अखेरची मानवंदना देण्यात आली.
लॅब्रोडोर जातीच्या लिओचा जन्म जुलै २०१६ मध्ये झाला होता. तो चार महिन्यांचा असताना सप्टेंबर २०१६ मध्ये पुणे पोलिस दलातील श्वानपथकात त्याचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर त्याला प्रशिक्षकाकडून खडतर प्रशिक्षण देण्यात आले. श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना त्याला अंमली पदार्थ शोधणे, तसेच कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘लिओ’चा गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर विविध शाळा, तसेच लष्कराच्या कार्यक्रमात लिओ सहभागी व्हायचा.
आठ वर्षांतील दमदार कामगिरी
- लिओ चार महिन्यांचा असताना त्याचा पुणे पोलिस दलात समावेश करण्यात आला होता. लिओ गेल्या आठ वर्षांपासून गुन्हे शाखेत कार्यरत होता.
- लोणी काळभोर येथील एका शेतातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत लिओ सहभागी झाला होता.
- एका नायजेरियन तस्कराकडून गांजा, तसेच मेफेड्रोनचा साठा पकडून देण्यात लिओची दमदार कामगिरी हाेती.
- तसेच २०१९ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- पुणे रेल्वे स्थानक, तसेच बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी ‘लिओ’ला नेण्यात यायचे.
- अन्य श्वानाच्या तुलनेत लिओची घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने त्याचा फायदा पोलिसांना झाला होता.