पुणे : प्रेमप्रकरणाची माहिती प्रेयसीच्या घरच्यांना सांगितल्याच्या रागातून मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी हा आदेश दिला आहे. आरोपीबरोबर असलेल्या दोन साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. ही घटना कोथरुड भागात 10 जुलै 2018 रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.
सुशांत रमेश ओंबळे (वय-24, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड, मूळ रा. विठ्ठलवाडी, पौड) यास न्यायालयाने जन्मठेप व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर अक्षय जोरी असे मृत्यू झालेल्या मित्राचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत ओंबळे आणि अक्षय जोरी हे दोघे मित्र होते. अक्षयचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबधांची माहिती अक्षयने तरुणीच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर सुशांत त्याच्यावर चिडून होता. या कारणावरुन त्यांच्यात वारंवार वादही होत असे. या कारणावरुन सुशांतने त्याच्या दोन मित्रांसोबत संगनमत केले. 10 जुलै 2018 रोजी त्यांनी अक्षयला कोथरुडमधील लोहिया आयटी पार्कमागील कलाग्राम सोसायटीच्या परिसरात बोलावून घेतले. अक्षय, सुशांत आणि दोन साथीदारांनी तेथे एकत्र येऊन दारु प्यायली. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा काही कारणावरुन वाद झाला. या वादामुळे बिअरची बाटली फोडून सुशांतने अक्षयच्या गळ्यावर वार केला. त्यादरम्यान, गंभीर जखमी झालेल्या अक्षयला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारांपूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणात सुशांतला अटक करुन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळी यांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावेळी गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार आणि इतर आवश्यक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ओंबळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.