अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील करंदी येथे एका शेतकऱ्याला शेतातील ऊस तोडणी करुन देतो, असे सांगून त्याच्याकडून वेळोवेळी ५ लाख ५० हजार रुपये घेऊन सदर शेतकऱ्याची दुचाकी वापरण्यास घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. संभाजी बाळू गालफाडे असं फसवणूक करून पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला केला आहे. याबाबत अमोल भाऊसाहेब ढोकले (वय-३१, रा. करंदी, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंदी येथील अमोल ढोकले यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केलेली असताना, सदर ऊस तोडणी करण्यासाठी संभाजी याने मी कामगार लावून ऊस तोड करुन देतो, असे म्हणून शेतकऱ्याकडून वेळोवेळी पाच लाख पन्नास हजार रुपये तसेच वापरासाठी दुचाकी घेतली. त्यानंतर संभाजी त्यांच्या कुटुंबियांसह फरार झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.