अहिल्यानगर : पाळीव पोपट मारल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना तीन महिने शिक्षा आणि प्रत्येकी पाचशे रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी सुनावली आहे. ऋषिकेश किशोर विधाटे (वय-२२), संदीप भाऊसाहेब विधाटे (वय-३४), नरेंद्र भाऊसाहेब विधाटे (वय-३७, सर्व रा. बाभुळखेडा, ता. नेवासे) असं शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
किसन मोरे (रा. बाभुळखेडा, ता. नेवासे) यांनी पोपट पाळला होता. ता.६ नोव्हेंबर २०२१ रोजी हा पोपट मारला गेला. त्यांचा मुलगा सखाहारी व त्यांच्या शेजारी राहणारा सुशांत रोहिदास मोरे यांनी विधाटे यांना या प्रकरणाचा जाब विचारला. याचाच राग मनात धरून ऋषिकेश विधाटे, संदीप विधाटे, नरेंद्र विधाटे यांनी सखाहारी व सुशांत मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
दरम्यान, किसन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध मारहाण करणे, शिवीगाळ आणि धमकविणे आणि ऑट्रॉसिटीच गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी जखमीची आई, दोघे जखमी, डॉ. बागवान व पंच, तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांची साक्ष महत्वाची ठरली.
तिन्ही आरोपींनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले. आरोपी हे तरूण असून, ते शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येकी तीन महिने साधा तुरुंगवास व प्रत्येकी पाचशे रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अॅड. विष्णूदास भोर्डे यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार एन. एल. चव्हाण, पोलिस अंमलदार भगवान वाघमोडे यांचे सहकार्य केले.