लोणी काळभोर : झायलोस इंटिग्रेटेड सोल्युशन प्रा. ली. कंपनीची फ्रॅन्चायजी देण्याच्या बहाण्याने कुंजीरवाडी येथील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२) उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याकुब अली खाजा अहमद व राघवेंद्र रेड्डी नानायाल असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष सुरेश काकडे (वय 39, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर प्रकार हा सप्टेंबर २०२१ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष काकडे यांना आरोपी याकुब अहमद यांनी कंपनीची फ्रॅन्चायजी घेतली तर जास्त फायदा मिळेल. असे आमिष दाखवून तक्रारदार यांना आमिष दाखविले. त्यानंतर आरोपी याकुब अहमद यांनी फ्रॅन्चायजीसाठीचे लागणारे ऑफिसचे भाडे, डिपॉझिट, इंटेरिअरचे काम करण्यासाठी आणि कंपनीचे हब विकत घेण्यासाठी काकडे यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ७ लाख ४४ हजार ६०० रुपये घेतले.
आरोपींनी काकडे यांच्याकडून पैसे घेऊन कंपनीची फ्रॅन्चायजी दिली नाही. त्यामुळे काकडे यांनी कंपनीचे संचालक याकुब अहमद यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने काकडे यांना शिवीगाळ केली. तसेच पैसे घेण्यासाठी हैदराबाद येथे आला तर जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच तुझे पैसे देणार नाही असे सांगितले.
दरम्यान, तक्रारदार काकडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी त्वरित सांगवी पोलिसांकडे धाव घेत कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध फिर्य़ाद दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात आयपीसी ४२०, ५०६, ५०४, ५०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम करीत आहेत.