अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई मांडवगण फराटा शिवेवर शेलारवाडी येथे बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हा परिसर फराटवाडी येथून एक किलोमीटर अंतराचा असल्याचेही वनाधिकारी यांनी सांगितले.
मांडवगण फराटा येथे १९ ऑक्टोबर रोजी बिबट्याने हल्ला केल्याने एका लहानग्याचा मत्यू झाला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पाच वर्षे शिवतेज टेंभेकर याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या भागातील नागरिक संताप्त झाल्याने वन विभागाच्या वतीने या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या जेरबंद व्हावे यासाठी पिंजरे लावले होते.
या परिसरात व त्या पासून एक किलोमीटर अंतरापर्यंत बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावले होते. दरम्यान, मंगळवार (दि. 26) पहाटे आदिनाथ पापळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या भक्ष खाण्यासाठी आला असता अलगद अडकला. गेल्या महिन्याभरात मांडवगण फराटा येथे दोन चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर हा नरभक्षक बिबट्या वन विभागाला पकडता आला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती.
तर वडगाव रासाई मांडवगण शिवेवर शेलारवाडी येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे वन विभागाला समजले होते. त्यात टेंभेकर यांच्या मृत्यूनंतर तो राहत असलेल्या फराटवाडी पासून एक किलोमीटर अंतरावर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले होते. त्यातच हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
घटनास्थळाला शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी कंक यांनी भेट दिली असून, बिबट्या जेरबंद झाला म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून वन विभागाचे ही आभार मानले आहे. दरम्यान, मांडवगण फराटा परिसरात अनेक ठिकाणी बिबटे सातत्याने निदर्शनास येत असून केवळ एकच बिबट्या जेरबंद झाला आहे. मात्र, या भागात अनेक बिबटे आढळत असून वन विभागाने यावरच न थांबता परिसरातील जेवढे शक्य होतील तेवढे बिबटे जेरबंद करावेत.
तरच या भागातील ग्रामस्थ भयमुक्त होतील, त्यामुळे वन विभागाने कुठलेही काम थांबवू नये, अशी मागणी राजीव पाटील फराटे यांनी केली आहे. मांडवगण फराटा गावात बिबट्याने दोन लहान मुलावर हल्ले केले होते. त्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या बिबट्याची पूर्ण तपासणी करावी अशी मागणी सरपंच समीक्षा अक्षय फराटे यांनी केली आहे.
मराठवाडी घटनेनंतर या परिसरातील एक किलोमीटरमध्ये लावलेल्या पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. वडगाव रासाई मांडवगण शिवेजवळ पकडलेला बिबट्या मादी बिबट्या असून हा पूर्ण वाढ झालेला आहे. त्याला माणिक डोह बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे. बिबट्याला सोडण्यासाठी स्थानिक नागरिक ही गेले होते.
भानुदास शिंदे, वनपाल, मांडवगण फराटा