योगेश शेंडगे / शिक्रापूर :
पिकवावे धन । ज्याची आस करी जन ।
पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ।।
खोली पडे ओली बीज । तरीच हाता लागे निज ।।
तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरे या तिन्ही ।।
या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलनामाच्या कधीही न संपणाऱ्या अमूल्य ठेव्याची महती सांगितली आहे. ही महती उरी बाळगून अन् ओढ मनी धरून श्री माऊलीच्या भेटीस आतुर झालेल्या वैष्णवांची मांदियाळी शिक्रापूर येथून आळंदीकरिता पायी मार्गस्थ झाली.
दरवर्षी विविध दिंडी स्वरूपात पुणे जिल्यासह इतर राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीच्या कार्तिकी एकादशी उत्सवात सहभागी होत माऊलीच्या गजरात तल्लीन होतात. याचप्रमाणे शिक्रापूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळातील वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा आज मार्गस्थ झाला.
परंपरेनुसार टाळ-मृदंगाचा निनाद.. दिंड्या, भगव्या पताकांचा भार.. डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी विठुनामाचा गजर करीत निघालेल्या वारकऱ्यांनी शिक्रापूर नगरीत चैतन्यमयी वातावरण तयार केले.
एकादशी असली की आठवतात ते वारकरी आणि त्यांची पायी होणारी वारी. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकायला वारकरी पायी पोहोचतात. आषाढी, कार्तिकी एकादशीला मोठा उत्सव बघायला मिळतो आणि या निमित्त यात्रा भरते. जशी पंढरपूर यात्रा प्रसिद्ध आहे, तशीच आळंदी यात्रा देखील. या निमित्त होणारा उत्सवही मोठ्या भक्तिभावाने पार पडतो.