पुणे : पुण्यातील वारजे परिसरात भरधाव दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातास जबाबदार ठरलेल्या दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. गौरी संजीवकुमार कलशेट्टी (वय २० रा. शिवाजी चौक, आंबेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणीचे नाव आहे.
याप्रकरणी दुचाकीस्वार अभिषेक गणेश बानगुडे (वय-२४ रा. नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहित कलशेट्टी (वय-४०) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित यांची बहीण गौरी आणि अभिषेक हे रविवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्य सुमारास मुळशी येथील एका मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी बाह्यवळण मार्गावर वारजे माळवाडी परिसरातील माई मंगेशकर रुग्णालयासमोर भरधाव वेगात मोटार आली.
त्यामुळे दुचाकीस्वार अभिषेकने ब्रेक दाबला असता दुचाकी घसरुन सहप्रवासी गौरी खाली कोसळली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे करत आहेत.