नाशिक: कांदा व लसूण यांचे दर सातत्याने वाढत असून सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५४५५, तर उन्हाळ कांद्याला ५४०० रुपये दर मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये देखील सरासरी हे दर टिकून आहेत. लाल कांद्याची आवक कमी असल्याने दर टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांकडे असलेला उन्हाळ कांदा जवळपास संपला असून, लाल कांद्याची आवक देखील कमी आहे. मागणी आणि पुरवठ्यातील मोठ्या तफावतीमुळे कांद्याच्या दरात वाढ होत आहे. यंदा खरिपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
लेट खरिपाच्या लागवड क्षेत्रात घट
राज्यात मागील वर्षी खरिपात दोन लाख ८५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती, परंतु यंदा लागवड वाढून तीन लाख ८२ हजार हेक्टरवर पोहोचली. त्यामुळे लागवड क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टरने वाढले होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपातील लागवड वाढली असली तरी लेट खरिपाची लागवड कमी झाली आहे. शिवाय गेल्या हंगामात लेट खरिपाची एक लाख ६६ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र यंदा ५५ हजार हेक्टरवरच लागवड झाली आहे.
आवक अन् बाजारभाव
लासलगाव बाजार समितीत सोमवारी लाल कांद्याची आठ हजार ५२२ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ११००, कमाल ५४५५ व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याची ३०८ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २७८१, कमाल ५४०० व सरासरी ५००० रुपये दर मिळाला. कांद्याबरोबरच स्वयंपाकात लसणाचा तडका देखील महागाईच्या भडक्यात सापडला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाला जसा फटका बसला, तसाच लसणाच्या उत्पादनाला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बाजार समितीत लसणाची आवक घटली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाजारात लसणाची आवक घटली आहे. बाजार समितीत सध्या आठवड्यातून एकदा ६०० ते ७०० क्विंटल लसणाची आवक होत असते. लिलावात लसणाला सध्या ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो, तर बाजारात ४५० ते ५०० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. हॉटेल व्यवसायिकांमध्ये लसणाची मागणी वाढली आहे. मात्र दर वाढल्याने स्वयंपाकघरातून आता लसूण गायब झाला आहे. शेतकऱ्यांकडून यंदा देखील लसणाची लागवड कमी झाली आहे. पूर्वी लसणाची लागवड चोपडा व सातपुडा पायथ्याशी अधिक होती. मात्र तीही आता घटली आहे. नवीन लसणाची आवक दोन ते तीन महिन्यांनी वाढणार आहे. त्यामुळे दोन महिन्यांपर्यंत लसणाचा तडका कायम राहण्याची चिन्हे आहेत.