मुंबई: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका संपताच जनतेला मोठा धक्का बसला आहे. सोमवारपासून सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये ही वाढ झाली आहे. मुंबईत दरवाढीनंतर १ किलो सीएनजीसाठी आता ७७ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, सीएनजी दरवाढ झाल्यानंतर रिक्षाच्या भाड्यात देखील वाढ होणार आहे.
देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीच्या किमती ७५.०९ रुपये प्रति किलोवर अपरिवर्तित राहिल्या, तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये दर किलोमागे २ रुपयांनी वाढून ८१.७० रुपये आणि गुरुग्राममध्ये ८२.१२ रुपये किलो झाले. एमजीएल आणि आयजीएलने वाढीची कारणे दिली नसली तरी नियमित किंवा एपीएम गॅसच्या पुरवठ्यात सलग दोन फेऱ्यांमध्ये कपात केल्यानंतर कंपन्यांना आता महागडा गॅस खरेदी करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर रिक्षा संघटनांनी राज्य परिवहन विभागाला पत्र लिहून मूळ भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे.
यामुळे आधीच महागाईचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. सध्या मूळ भाडे २३ रुपये असले तरी सीएनजी दरवाढीचा परिणाम रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर होणार आहे. यासाठी मूळ भाडे २६ रुपये करण्यात यावे, अशी संघटनांची मागणी आहे. भाडेवाढीच्या गरजेबाबत आम्ही विविध सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे. आमच्या गणनेनुसार मूळ भाड्यात तीन रुपयांनी वाढ करण्याची गरज आहे, असे रिक्षा संघटनेचे नेते थम्पी कुरियन यांनी सांगितले. मुंबई महानगर क्षेत्रात चार लाखांहून अधिक रिक्षा आहेत. ऑटोचे मूळ भाडे ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ रुपयांवरून २३ रुपये करण्यात आले.