इंदापूर, (पुणे) : इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तावशी (ता. इंदापुर) गावाच्या स्मशानभुमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तिच्या खुनाचा तपास लाकुड व हाडाच्या राखेवरुन लावून खुन करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व वालचंदनगर पोलिसांनी हि कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे पोलीस दलात कौतुक केले जात आहे.
दादासाहेब मारुती हरिहर (वय – 30,विशाल सदाशिव खिलारे (वय 23 रा.दोघे, रा.गोळखी, ता.फलटण, जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नाव असून वालचंदनगर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. तर हरिभाऊ धुराजी जगताप (वय 74, रा.गंगाखेड जि. परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तावशी (ता. इंदापुर) गावाच्या हद्दीमधील स्मशानभूमीत 16 नोव्हेंबरला लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असुन त्या बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी वालचंदनगर पोलिसांना दिली होती. त्यानुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पुर्णपणे जळालेले हाडे तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसून आले. हा घातपाताचा प्रकार असल्याने पोलीस स्टेशन येथे नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात सुरुवात केली.
त्यानुसार वालचंदनगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांत्रिक व गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत तपास करण्यास सुरुवात केली. यावेळी स्मशानभूमीतआढळून आलेले जळके व शिल्लक लाकडे ही गुणवरे, (ता. फलटण) येथील वखारीमधील असल्याचे सोमवारी (ता. 18) माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब हरिहर व त्याचा मित्र आरोपी विशाल खिलारे यांनी लाकडे खरेदी करुन मयताच्या अंत्यविधी करीता वाहनांमध्ये घेवुन गेल्याचे सांगितले.
दरम्यान, दोघांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता दोघांनी गंगाखेड येथील जगताप मामा याचा दादासाहेब हरिहर याच्या बायकोवर वाईट नजर असल्याच्या कारणावरुन दोन्ही आरोपींनी कट रचुन हरिभाऊ जगताप याला गंगाखेड येथुन सतोबाची यात्रा, टाकेवाडी, (ता. माण, जि. सातारा) येथे जेवण करण्याच्या निमित्ताने सोबत घेवुन शुक्रवारी (ता. 15) मध्यरात्री तावशी येथील स्मशानभुमीजवळ लघवीला म्हणून गाडी थांबवुन हरिभाऊ जगतापच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यास जिवे ठार मारले. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हरिभाऊ जगताप याला स्मशानभुमीमध्ये जाळले असल्याची दिली.
सदर गुन्हयाचा तपास पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगेे,कुलदीप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली, बाळासाहेब कारंडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, विक्रम जाधव, अजित थोरात, अभिजित कळसकर,अजित राऊत, अजय घुले, स्वप्निल अहिवळे, निलेश शिंदे यांनी तपास करुन खुन प्रकरण उघडकीस आणले.