मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. नाना पटोले आज राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. नाना पटोले यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी असून राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून ते आज वरिष्ठांशी बोलून राजीनामा देण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाना पटोले यांना जबाबदार धरत अपयशाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडले आहे. पटोलेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर पटोलेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोले यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवलं आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.