कराड : नुकत्याच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीने जोरदार मुसंडी मारत बहुमत प्राप्त केलं आहे तर महाविकास आघाडीला मात्र पराभव पत्करावा लागला आहे. अशातच राज्यात बारामतीत काका-विरुद्ध पुतण्या सामना चर्चेत आला होता. यामध्ये काकांनी बाजी मारली असली खरी पण कर्जत-जामखेडमध्ये अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी मैदान मारलं आहे. आज कराड येथे अजित पवार आणि रोहित पवार हे आमनेसामने आले होते. या अचानक भेटीत यावेळी अजितदादांनी रोहित यांना ‘दर्शन घे काकाचं’ असं म्हणत टोला लगावला. त्यावेळी रोहित पवार यांनी काका अजितदादांना वाकून नमस्कार केला. तसेच ‘रोहित तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं’, असे अजितदादांना रोहित पवारांना यावेळी म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते हजेरी लावताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रितीसंगमावर येऊन यशवंतरावांना अभिवादन केले. त्यानंतर अजित पवार, रोहित पवार यांनीही यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन केले.
रोहित पवार अन् अजितदादा समोरासमोर भेट..
रोहित पवार अन् अजितदादा समोरासमोर भेट झाली. रोहित पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला. अजितदादांनी त्यांना आशीर्वाद देत विधानसभा निवडणुकीतील रोहित पवारांच्या विजयाचा संदर्भ देत त्यांची चांगली फिरकीही घेतली. तसेच रोहित पवारांना अजित पवार ‘ऑल दि बेस्ट’ सुद्धा म्हणाले. अवघ्या 1243 मतांनी रोहित पवार यांचा निसटता विजय झाला आहे. त्यावरुन ‘माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असते,’ असे सांगत अजितदादांनी रोहित यांना डिवचल्याच दिसून आले.