मुंबई : नुकत्याच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये महायुतीला राज्यात दणदणीत विजय मिळाला तर महाविकास आघाडीचा मात्र दारुण पराभव झालेला बघायला मिळाला. आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लागलं आहे. देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यापैकी कोण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष देऊन आहे. मात्र, त्यापूर्वी महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतल्या बैठकीआधी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा करण्यात आली आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपला 23 ते 26, तर शिवसेनेला 9 ते 11, राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.तसेच शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली असून उदय सामंत यांनी मांडलेला ठराव एकमताने संमत करण्यात आला. यंदाही शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं असा शिवसेनेच्या आमदारांचा बैठकीतला सूर होता. महायुती एकसंघ आहे, महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कोणीही करू नये. अशा सूचना एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित आमदारांना देण्यात आल्या. दरम्यान लाडक्या बहिणींचा विश्वास संपादन केला असून आता लाडक्या बहिणींना 2100 रूपये देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आला असून मुंबईत आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार असल्याचं बोललं जात आहे.