ओमकार भोरडे / तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे मागील आठवड्यात शेत कामाचे साहित्य आणण्यासाठी चाललेल्या व्यक्तीच्या दुचाकीला समोरून आलेल्या दुचाकीची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिल विश्वनाथ हिरवे (वय ३१ वर्षे रा. धायरकर वस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत चंद्रसिंग खंडू गायकवाड (वय २५, वर्षे रा. विठ्ठलवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दुचाकी वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव ढमढेरे येथील धायरकर वस्ती येथून ११ नोव्हेंबर रोजी चंद्रसिंग गायकवाड व अनिल हिरवे हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच २५ बी बी २०२४ या दुचाकीहून शेतातील पिकांच्या कामासाठी औषध फवारणीचे पंप आणण्यासाठी चाललेले होते. त्यावेळी तळेगाव ढमढेरे येथे समोरून आलेल्या एम एच २० जी एन ९२३३ या दुचाकीची जोरदार धडक बसली.
या अपघातात चंद्रसिंग गायकवाड व अनिल हिरवे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. या दोघांवर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान अनिल गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील व राजेश माने करत आहेत.