पुणे : पुण्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मध्यरात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर भरधाव वेगाने जात असताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी आपल्या जीवाशी गाठ असते. पण, वेगाचे वेड असलेल्या तरुण पिढीच्या डोक्यात ते शिरतच नाही. अन एखाद्या क्षणी दुर्लक्ष होते आणि होत्याचे नव्हते होते.
अशातच आता भरधाव वेगातील मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी कात्रज येथील मोरेबाग बसस्टॉपसमोर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
हर्षद दिपक बर्गे (वय-२५ रा. मिलेटरी हौसिंग सोसायटी,सातारा.) असे दुर्दैवी मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र ऋषिकेश हेमंत धोत्रे (वय-२६, रा. देशमुख कॉलनी, सातारा.) यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश आणि त्याचा मित्र हर्षद बर्गे हे दोघेजण दुचाकीवरुन भरधाव वेगात जात होते. त्यावेळी हर्षद याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोरेबाग येथील बसस्टॉप समोरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ते दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान, या अपघातात हर्षद याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र ऋषिकेश धोत्रे हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.