पुणे : कात्रज भागातील सराफी पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीनांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज गावातील गणेश मित्र मंडळाजवळ शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोयते, तसेच दुचाकी, मिरची पूड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी यश रोहीदास बोरकर (वय-१८), प्रसाद राजू कांबळे (वय-१९), आर्यन दत्तात्रय काळे (वय-१८, रा. अंजनीनगर, गणेश कॉलनी, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी चेतन गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज गावातील गणेश मित्र मंडळाजवळ टोळके थांबले असून त्यांच्याकडे कोयता, पालघन अशी शस्त्रे असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडून कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
त्यांच्याबरोबर असलेले तिघे जण पसार झाले आहेत. आरोपींचे साथीदार अल्पवयीन असून, त्यापैकी एकाविरुद्ध खुनाचा गु्न्हा यापूवी दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करत आहेत.