मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘हा लावून घेतलेला निकाल आहे’, अशी टीका केली होती. अशातच आता बुलढाणा विधानसभा मतदासंघातून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. ते आता आयुष्यात कधीही खासदार होणार नाहीत,” असं विधान गायकवाड यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवणार आहे, त्यामुळे सरकारचा शपथविधी गुजरातमधील स्टेडियममध्ये घ्यावा, असा टोला लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
संजय राऊत यांनी ईव्हीएमवर शंका घेत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, “ईव्हीएममधून आदित्य ठाकरे हेही विजयी झाले आहे. मग त्यावरही आक्षेप घेणार का ? ठाकरे गटाचे लोकही निवडून आले आहेत, त्यावरही आक्षेप घेणार? हा विजय लाडक्या बहिणींचा आहे, महायुतीच्या कामाचा आहे. जनेतेने विरोधकांना धुळ चारली आहे, पण ते आता रडीचा डाव खेळत आहेत. महायुतीला मिळालेला विजय हा कामाचा परिणाम आहे”.