कराड : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत आम्हाला अपेक्षित होता तसा निकाल लागला नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. विधानसभा निकालावर अखेर शरद पवार यांनी मौन सोडलं आहे. शरद पवार आज कराडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे अवघ्या 10 जागांवर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात त्यांचा पक्ष सर्वात लहान पक्ष ठरला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करणार नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. असा अनुभव आम्हला कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं महत्त्वाचे आहे, असं शरद पवार म्हणाले.
पुढे म्हणाले, जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणींचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळत आहे. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचारही करण्यात आला. दोन अडीच महिन्याची रक्कम एकत्र देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होईल. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं, हे प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
तसेच विरोधकांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिल्यानंतर मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कुणाची, हा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना शरद पवारांनी अजित पवार यांच्या जास्त जागा निवडून आल्या आहेत. हे मान्य करावे लागेल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, असंही शरद पवार म्हणाले.