पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन असताना मुलगी गर्भवती राहिल्याने मुलगा व त्याच्या आईवडिलांनी जबरदस्तीने आपल्या मुलाबरोबर बाल विवाह लावून दिला. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वडिलांनी मुलीला घरी आणले. याच रागातून जावयाने सासऱ्यावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोंबर २०२३ ते २२ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडली.
याबाबत मुलीच्या ५८ वर्षाच्या वडिलांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुलगा व त्याच्या आईवडिलांवर पोस्को तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असताना आरोपी मुलाने तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवले. तिला वेळोवेळी आपल्या घरी नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्यांनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीचा आपल्या मुलाबरोबर जबरदस्तीने बाल विवाह लावून दिला.
मुलगी सासरी नांदत असताना तिला वेळोवेळी मानसिक व शारीरीक त्रास देण्यास सुरुवात केली. हे समजल्यावर फिर्यादी आपल्या मुलीला घरी घेऊन आले. याचा राग मनात धरून फिर्यादी हे शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पान शॉपच्या पाठीमागे रिक्षा पार्क करीत असताना जावयाने त्यांच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिरे करीत आहेत.