-संदिप टूले
पुणे : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप महायुतीचे सरकार येण्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल यांना भाजप महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेमध्ये आमदार राहुल कुल यांना निवडून द्या, त्यांना मंत्रीपद देण्याचे जबाबदारी माझी, असे आश्वासन फडणवीस यांनी दिली होती. तसेच 2024 च्या ही निवडणुकीच्या सांगता सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेमध्ये पुन्हा एकदा मतदारांना साद घालत राहुल कुल यांना निवडून द्या, त्यांना मंत्री करतो. तसेच त्यांचं मताधिक्य 20 हजारांच्या पुढे असेल तर कॅबिनेट मंत्री करतो, असे आश्वासन त्यांनी वरवंड च्या सभेत दिले होते. तेच आश्वासन फडणवीस पाळणार का? अशी चर्चा दौंड तालुक्यात सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दौंड ला अद्याप मंत्री रूपातून लाल दिवा मिळाला नाही. गेली 10 वर्षांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून राहुल कुल यांची ओळख आहे. मागील 5 वर्षापासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे ग्रामीण मधील भाजपमध्ये एकमेव राहुल कुल हे आमदार म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. राहुल कुल यांचा दौंड मतदारसंघ पवारांच्या बारामती मतदार संघाच्या शेजारीच लागून आहे.
स्वतंत्र काळापासून दौंड मंत्रिपदासाठी वंचित
2019 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना मैदानात उतरवले होते. त्यावेळी कांचन कुल यांचा पराभव झाला होता, पण पुणे जिल्ह्यातील अनेक मातब्बरांनी पवार विरोधी लढण्यास नकार दिला पण कुल यांनी समोर मोठे आव्हान असतानाही देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळला व खंबीरतेने बारामती लोकसभा लढले. तसेच मुळशी धरणाचे पाणी, भीमा पाटस कारखाना या महत्त्वाच्या विषयांमध्ये फडणवीस यांनी वेळोवेळी कुल यांना मदत केली आहे. कुल यांच्या घरामध्ये 2009 ते 2014 चा अपवाद वगळता 1990 पासून 30 वर्ष आमदारकी आहे. आमदार कूल यांचे वडील दिवंगत सुभाष अण्णा कुल, आई रंजना कुल यांनी दौंड विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु अद्याप दौंडला मंत्रिपद मिळाले नाही.
आरोग्यदूत म्हणून जिल्हाभर ओळख
राहुल कुल यांची आमदार म्हणून तिसरी टर्म चालू झाली आहे. या टर्ममध्ये भाजप विरोधी पक्ष असताना विधानसभेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला. एक अभ्यासू, प्रगल्भ, दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोविड महामारी मध्ये केलेले काम, जवळपास 5 हजार रुग्णांना निस्वार्थ मदत, यामुळे आरोग्य दूत म्हणून असणारी त्यांची ओळख जिल्हाभर आहे.
मागील झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी मतदान प्रतिनिधी म्हणून कुल यांची निवड केली होती. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गोव्यावरून मुंबईत आणण्याची जबाबदारी ही आमदार कुल यांच्यावरती देण्यात आली होती. तसेच अनेक महत्वाच्या ऑपरेशन ची महत्वाची जबाबदारी कुल हे पार पाडत आले आहे. थोडक्यात कुल हे फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी ओळखले जातात. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ देण्यासाठी आमदार कुल यांना मंत्रीपद यावेळी नक्की मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.