IPL Auction 2025 Most Expensive Player Rishabh Pant : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामासाठी लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरु झाला आहे. आजपासून (दि. २४) हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. या लिलावात 10 संघ निश्चित होणार असून आजच्या लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे.
सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, काही वेळातच हा विक्रम मोडला गेला. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
लखनऊने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभला 27 कोटींना खरेदी केले आहे. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू बनला आहे. यामध्ये त्याने अवघ्या दहा मिनटात श्रेयस अय्यरला मागे टाकले आहे. जो थोड्याच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला आणि अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली होती.
त्यानंतर ऋषभ पंतसाठी लखनऊ आणि आरसीबी यांच्यामध्ये सुरुवातीला सामना रंगला होता. मात्र, लखनऊनेही हार मानली नाही. हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत 17 कोटींच्या पुढे गेली.
हैदराबाद आणि लखनऊ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनऊने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. पण, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनऊने पंतसाठी 27 कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला.
केएल राहुलसाठी १२ कोटींची बोली
केएल राहुलने 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीने लिलावात प्रवेश केला. राहुलसाठी आरसीबी आणि गतविजेत्या केकेआरमध्ये स्पर्धा होती. दिल्लीनेही राहुलमध्ये स्वारस्य दाखवले. दिल्लीने राहुलसाठी 11.50 कोटी रुपयांची बोली लावली, मात्र, केकेआरही मागे हटायला तयार नव्हते. दिल्लीने राहुलसाठी १२ कोटींची बोली लावली, पण केकेआरने माघार घेतली. दरम्यान सीएसकेने बोलीमध्ये उडी घेतली आणि राहुलसाठी बोली लावली. दिल्लीने 14 कोटींची बोली लावली आणि लखनऊने राहुलसाठी आरटीएमचा वापर केला नाही.