आळंदी : माउली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिक वारीमध्ये गर्दीचे नियोजन करण्यासाठी कालपासून (ता. २३) ते शनिवार (ता. ३०) आठ दिवसांसाठी आळंदीत प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीची वाहने आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना बंदीपासून सूट देण्यात आली आहे.
मंगळवार (ता. २६) कार्तिक एकादशी तर गुरुवार (ता. २८) माउलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. यानिमित्त आळंदीमध्ये राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. यामुळे वाहतुकीत बदल केल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे. शहरात देहूफाटा चौकातील एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत.
तर पीएमटीच्या बस चऱ्होली फाटा आणि डुडुळगाव येथील बस थांब्यापर्यंत सोडल्या जाणार आहेत. आळंदीला येणारी चारचाकी, अवजड वाहने पुणे-आळंदी रस्त्यावर चऱ्होली फाटा चौक, मोशी- आळंदी रस्त्यावर डुडुळगाव जकातनाका, चिंबळी आळंदी रस्त्यावर केळगांव चौक/बोपदेव चौक, चाकण आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटल, वडगाव घेनंद मार्गे-आळंदी रस्त्यावर विश्रांतवडी, मरकळ-आळंदी रस्त्यावर धानोरेफाटा/पीसीएस चौक येथून वाहने आळंदीला जावू न देता अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत.