पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात विजयी चौकार मारणाऱ्या माधुरी मिसाळ या भाजपच्या पुणे शहरातील जुन्या आणि अनुभवी आमदार आहेत. त्यांना मंत्री पदाची संधी मिळू शकते. मागील वेळी मंत्रीपदापासून त्या वंचित राहिल्या होत्या. तसेच भीमराव तापकीर हे देखील मंत्री पदाच्या शर्यतीत येऊ शकतात. महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर २००९ साली मिसाळ या प्रथम आमदार म्हणून विजयी झाल्या.
त्यानंतर २०१४ आणि २०१९ या पंचवार्षिक निवडणुकीत मिसाळ यांनी विजय मिळविला होता. सलग तीन वेळा आमदार झालेल्या मिसाळ चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांनी विजय मिळविले आहे. त्यामुळे एक ज्येष्ठ सदस्या म्हणून मिसाळ या मंत्री पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहे. मागील विधानसभेत तिसऱ्यांदा त्या विजयी झाल्यानंतर मिसाळ या मंत्री होतील असे वाटत होते.
मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अडीच वर्षापुर्वी महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मिसाळ यांची मंत्री मंडळात वर्णी लागेल असे वाटत होते. परंतु, त्यांना अडीच वर्ष वाट पहावी लागली. यावेळी त्या मंत्री पदाच्या प्रमुख दावेदार आहेत. तसेच भीमराव तापकीर हे देखील सलग तीन वेळा निवडुन आले होते, त्यांनी चौथ्यांदा विजय मिळविला असुन, ते देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असतील.