कुरळप : ट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील चौघे जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडीनजीक (ता. वाळवा, जि. सांगली) शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आनंद भीमराव कदम, महंमदअली शौकतअली सय्यद, जेकेब मायकल पाटोळे व युसूफ रफिक शेख (सर्व रा. पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी जखमी शुभम गणेश चवंडके (गवळीवाडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रकचालक फकीर आप्पा जीड्डीमनी याच्यावर कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाच मित्र शुक्रवारी रात्री उशिरा कारने (एमएच 12 एक्सएच 3278) गोव्याला निघाले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची कार पुणे-बंगळूर महामार्गावरील तांदुळवाडीजवळ आली असता, कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या ट्रकच्या (केए 22 डी 6999) चालकाने त्यांच्या कारला डाव्या बाजूने घासले. त्यामुळे कार बाजूला ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणार्या खड्ड्यात गेली.
यावेळी कारचा समोरील भाग खड्ड्यात असणार्या गाळात अडकला. त्यामुळे खड्ड्यातील पाणी कारमध्ये शिरले. चारीहीजण कारमध्ये अडकून पडले. त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बुडाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक सुनील माने तपास करीत आहेत.