कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्वातून दोन टोळ्यांमध्ये गोळीबाराचा थरार घडला आहे. ही घटना शनिवारी (दि.23) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत दोन्ही टोळ्यांतील 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
श्रीकांत तानाजी मोहिते (वय-32, रा. शिरोली पुलाची ता. हातकणंगले) हा जखमी झाला आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदमापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप घेण्याच्या कारणावरुन शिरोली येथील दोन गटामध्ये मोठा राडा झाला. गुरुवारी (दि.21) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान शिरोलीत दोन गटात मारामारी झाली होती. त्यानंतर अविनाश कोळी याचा गट आदमापुरातील एका हॉटेलमध्ये जाऊन लपला होता. कोळी यांच्या शोधात शनिवारी सकाळी विनायक लाड कोळी यांच्यासह चौघे आदमापुरातील त्रिवेणी हॉटेलमध्ये गेले. त्यादरम्यान, व्हरांड्यातच समोरुन येत असलेल्या विरोधी टोळीवर त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यावेळी प्रत्युत्तर देणारा श्रीकांत मोहिते हा मांडीला गोळी लागल्याने जखमी झाला. यानंतर चार ते पाच मिनीटांच्या थरारानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेतील गोळीबारात तीन पिस्तुलांतून चार गोळ्या झाडल्या गेल्या. हॉटेलमध्ये घुसलेले विनायक लाड-कोळी आणि अनिकेत लाड-कोळी यांनी दोन पिस्तुलांमधून गोळीबार केला. त्याला श्रीकांत मोहिते याने प्रत्युत्तर दिले. पोलीसांनी दोन पिस्तुले आणि चार तलवारी जप्त केल्या आहे.
याप्रकरणात गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे, दोन राऊंड, तलवार, कोयता जप्त करण्यात आला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. शिरोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी रोहित सातपुते टोळीने विनायक सुकुमार लाड-कोळी यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी विनायकने दिलेल्या फिर्यादीवरुन सातपुते टोळीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमका वाद काय आहे?
आर्थिक वादातून अभिजीत कोळी आणि त्याच्या सहका-यांनी अनिकेत कोळीसह त्याच्या मित्रांचा खून करण्याची सुपारी श्रीकांत मोहिते याला दिली होती. याच कारणातून गोळीबाराची घटना घडल्याचे फिर्यादी अनिकेत कोळी याने पोलीसांना सांगितले.
याप्रकरणी अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी याच्या फिर्यादीनुसार, पोलीसांनी अभिजीत अनिल कोळी, अविनाश अनिल कोळी, श्रीकांत तानाजी मोहिते, अभय उर्फ अभी एकनाथ काळोखे, वैभव साठे, प्रताप मोरे, कार्तिक राजूरकर, जॉय भालेराव, अली बालेचान तानेखानस रोहित शहाजी सातपुते, अमोल कोळीस प्रसाद कांबळे आणि अनिकेत आनंदा कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.