अहिल्यानगर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकांच्या निकालाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्जत जामखेडच्या अटी-तटीच्या लढतीत रोहित पवारांना निसटता विजय मिळाला आहे. पण, रोहित पवारांचा लीड कमी झाल्यानं रोहित पवार यांच्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवारांनी माहिती दिली आहे.
सुरुवातीला रोहित पवारांचा 352 मतांनी पराभव झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, मशीनमध्ये तांत्रिक घोळ झाल्याने या जागेवर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यामध्ये रोहित पवार यांनी आघाडी घेत विजय मिळवला. आमदार रोहित पवारांचा लीड कमी झाल्याने रोहित पवार यांच्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची स्वतः रोहित पवार यांनी माहिती दिली.
कर्जत तालुक्यातील शिंपोरा गावातील येजेराव काळे (वय 60) यांचा टीव्ही पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रोहित पवारांचा लीड कमी झाल्याचं पाहून हृदयविकाराच्या झटक्यानं येजेराव यांचा मृत्यू झाल्याचे रोहित पवारांनी सांगितलं आहे. या मतदारसंघातील पवार साहेबांवर प्रेम करणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे काळे भाऊ लीड कमी झाली, त्यावेळी त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला, त्यांना मी श्रद्धांजली वाहतो, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांचा निसटता विजय..
कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी 1243 मतांनी विजय मिळवला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मतं मिळाली. तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना 1 लाख, 26 हजार 433 मतं मिळाली आहेत. ळाली.