पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या मानसिक छळास कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रियंका अक्षय गाडे (वय 27, रा. आनंदनगर, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती अक्षय राजेंद्र गाडे (वय 29 रा. आनंदनगर, हांडेवाडी, हडपसर, मूळ रा. कोतन, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती अक्षयने पत्नी प्रियंकाकडे वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पत्नीने पैसे आणण्यास नकार दिल्याने तो तिला वारंवार त्रास देत होता. त्या कारणामुळे अक्षय तिला मारहाण करायचा. पतीच्या छळामुळे पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. प्रियंकाने आत्महत्या करण्यापूर्वी एका पुठ्ठ्यावर मजकूर लिहून ठेवला होता. पतीच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे पत्नी प्रियकांने पुठ्ठ्यावर लिहून ठेवले होते.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. प्रियंका यांचे वडील अजिनाथ सीताराम चांदणे (वय 61, रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रियंकाच्या वडिलांनी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाची पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.