पुणे : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने जोरदार विजय मिळवत विरोधकांचा धोबीपछाड केला आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. महायुतीने मैदान मारून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सज्ज झाली आहे. महायुतीला 234 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा भाजप, त्यानंतर शिंदे गट आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्या आहेत.
राज्यात मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा पॅटर्न बघायला मिळणार आहे. परंतु राज्यात विरोधीपक्षनेता नसणार आहे. विरोधीपक्ष नेता असण्यासाठी एक दशांश आमदारांची संख्या असावी लागते. जी आता मविआमधील कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे महाराष्ट्रच्या विधानसभेत यंदा विरोधीपक्ष नेता नसणार आहे. म्हणजेच 288 पैकी कोणत्याही पक्षाचे किमान 29 आमदार असावे लागतात, असा नियम आहे. मात्र विधानसभेत सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट, कॉग्रेस किंवा उबाटा तिन्ही पक्षापैकी एकाकडेही 29 आमदार संख्या नाही.
राज्यात लागू होणार मावळणकर रूल..
लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की विरोधी पक्षाला एकूण जागांच्या दहा टक्के सुद्धा जागा मिळालेल्या नाहीत. त्यावेळेस त्यांनी सभापती पदाच्या खुर्चीतून एका बाबीचा पुकारा केला विरोधी पक्ष म्हणून पुरेसे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे अन्यथा त्या पदाला अर्थ उरणार नाही म्हणून यापुढे जर सत्तेत नसलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला एकूण लोकसभेतील जागांपेक्षा 10% पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत तर संसद संसदेत / लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद असणार नाही.
लोकशाहीमध्ये असे कायदे नियम महत्त्वाचे असतात तसेच संसदीय लोकशाहीत काही संकेत देखील महत्त्वाचे असतात. गणेश वासुदेव मावळणकरांनी जो संकेत त्या दिवशी खुर्चीत बसून घालून दिला तो ‘मावळणकर रुल’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि आज तागायत अस्तित्वात आहेत.
महाराष्ट्राच्या सध्याच्या आकडेवारी 288 च्या दहा टक्के म्हणजे एकूण 29 किंवा त्यापेक्षा अधिक इतक्या जागा सत्तेत नसलेल्या कोणत्याही एका पक्षाला मिळताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच मावळणकर रूल लागू होणार आहे. विरोधी पक्ष नेता विधानसभेत कदाचित असणार नाही त्याऐवजी गटनेतेपद असेल अशी सध्या चर्चा आहे.