मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे, तर महाविकास आघडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाली आहेत. राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारत 230 जागांवर विजय मिळवला आहे. 1990 नंतर भाजपनं तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष ठरला आहे.
आता देशासह राज्यच लक्ष मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लागलं आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमान दिली जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला जोरदार कामगिरी करता आलेली नाही. मविआला अर्धशतकाचा आकडा सुद्धा गाठता आला नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईकरेट असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागाच जिंकता आल्या आहेत.
नव्या सरकारचा 25 तारखेला शपथविधी..
नव्या सरकारचा 25 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळाली आहे. हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू रंगू लागली आहे. महायुतीच्या नेत्यांकडून वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री कोण होणार? ते अजून ठरलं नसलं तरी आज शपथविधी सोहळा कुठे होणार त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2014 मध्ये युतीने सत्ता मिळवली होती, त्यावेळी शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा 2024 चा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी, 25 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री कोण होणार यावर आज चर्चा.
मुख्यमंत्री कोण होणार यावर आज चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मुख्यमंत्रिपदाच्या हालचालींना आज वेग आला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचा असेल अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अमित शाह यांनी फडणवीस मुख्यमंत्री होणार असे संकेत एका सभेदरम्यानच दिले होते. आता नेमका काय निर्णय होतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं आहे.