Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी सुरु आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या 200 हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य दरेकर यांनी यावेळी केलं आहे.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, “लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”
देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं त्यासाठी हम सब एक हैचा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं दरेकर म्हणाले.