पुणे : सोसायट्यांमधील पाणीगळतीची कामे तत्काळ दुरुस्त करून घ्यावीत. बांधकामाला, बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २) आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
महापालिकेला मंजूर पाण्याचा कोटा, मागील वर्षातील पाण्याच्या स्रोत निहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्र, समान पाणीपुरवठा प्रकल्प, टाक्या, जलवाहिन्यांच्या कामाची प्रगती आणि नियोजन, जलमापक बसविण्याच्या कामाची प्रगती आणि नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, की पाण्याच्या टाक्यांची कामे महापालिकेने निर्धारित कालमर्यादेतच सप्टेंबर २०२३ पर्यंत तर जलवाहिनीचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे. समान पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवणक्षमता वाढवून ३३ टक्क्यांपर्यंत होऊन सर्वांना समान पाणी मिळणार आहे.
पाणीगळती थांबवण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात याव्यात. सोसायट्यांमधील पाणीगळतीची कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत. पाणीगळती थांबवण्यासाठी जुन्या पाइपलाइन बदलण्यात याव्यात. कामांसाठी आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या वाढवून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत.