नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये ६७.५७ टक्के मतदान झाले आहे. गत तीन निवडणुकांच्या तुलनेत मतदान वाढल्याने हा वाढलेला टक्का कुणाला तारणार आणि कुणाला धक्का देणार अशी उत्सुकाता उमेदवारांसह मतदारांना लागली आहे. अर्थात, वाढलेल्या या मतदानाच्या टक्क्यावरून अनेक राजकीय आडाखे बांधले जात असून, २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ५० लाख ६१ हजार १८५ इतकी असून, त्यात २६ लाख १४ हजार ९६ पुरुष व २४ लाख ४६ हजार ९६८ महिला मतदार आहेत. तसेच, इतर मतदारांची संख्या १२१ इतकी आहे. यंदा एक लाख २१ हजार १०८ नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत सुमारे सात ते आठ टक्के वाढ प्रशासनाने अपेक्षित धरली आहे. गेल्या तीन निवडणुकांत झालेल्या मतदानाची टक्केवारी ६२ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे ही टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद आणि महापालिकेने देखील विविध सामाजिक उपक्रम हाती घेत मतदानाविषयी जागृती करण्यावर भर दिला होता. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५९.८६, २०१४ मध्ये ६२.२४, तर २०१९ मध्ये ६२.०९ टक्के मतदान झाले होते.
हे मतदारसंघ ठरले लक्षवेधी
१५ मतदारसंघांपैकी निम्म्याहून अधिक मतदारसंघ लक्षवेधी ठरले आहेत. यात येवला, नांदगाव, चांदवड-देवळा, नाशिक मध्य, मालेगाव बाह्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याचबरोबर नाशिक पूर्व मतदारसंघ देखील यावेळी विशेष चर्चेत राहिला. बंडखोरी आणि उमेदवारांमधील वाद, तसेच कार्यकर्ते व समर्थकांमधील राडा यामुळे संबंधित मतदारसंघ चांगलेच चर्चेत राहिले असून, या मतदारसंघांतील मतदार कुणाला कौल देतात, याकडे लक्ष लागून आहे.