पिंपरी : राज्यभर काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या दरम्यान काही ठिकाणी अनुचित प्रकारही घडले. अशातच बेकायदेशीरपणे मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाऊन मतदान करतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकणार्या तरुणास सांगवी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्टिन जयराज स्वामी (वय २५, रा. संध्यानगरी सोसायटी, पिंपळे निलख) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत निवडणुक मतदान केंद्राधिकारी नरेंद्र देशमुख (वय ५४, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपळे निलख येथील विद्या विनयनिकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४७४ या मतदान बुथवर हा प्रकार बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मतदान बुथवर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून कर्तव्य पार पाडत होते. यावेळी आरोपीने स्वत:चे मतदान करताना, बॅलेट युनिट व व्ही व्ही पी ए टी यांचे फोटो काढल्याचे व बॅलेट युनिटवरील अं. क्रमांक १ वरील तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीवर बटण दाबून मत टाकल्याचा व तशी स्लिप व्ही व्ही पॅटमध्ये दिसून आली. हा फोटो व व्हिडिओ त्याने स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट वर स्टोरी ठेवून प्रसारित केले. हे करताना त्याने मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला व निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चेवले तपास करीत आहेत.