गोंदिया : भांडणाचा राग मनात ठेवून घरासमोर जाऊन बहीण, भावावर तलवारीने घाव घालत पुन्हा वीट फेकून मारली. ही घटना शहरातील पेंढारी मोहल्ला कुडवा येथे १५ नोव्हेंबरला घडली. या मारहाणीत बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले.
शहरानजीक असलेल्या पेंढारी मोहल्ला कुडवा येथे राहणारे हर्ष राजेश पाटील (२३) आणि कृती राजेश पाटील (२६) हे दोघेही बहीण-भाऊ घटनेच्या दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास आपल्या घरी होते. दरम्यान शुभम सुभाष श्यामकुवर (१९, रा. आंबेडकर चौक, कुडवा) आणि विकास शैलेश उके (२९, रा. कुडवा) हे त्यांच्या घरासमोर आले. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून शुभम आणि विकासने हर्ष आणि त्याची बहीण कृतीसोबत भांडण करून तलवारीने हल्ला केला.
तसेच वीट फेकून मारली. त्यामुळे दोन्ही बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले. घरातील व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय अहवाल आणि तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी विकास आणि शुभ्रमविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास साहाय्यक फौजदार नामदेव बनकर करीत आहे.