धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच शिरपूर-चोपडा महामार्गावर थाळनेर पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने चांदीच्या विटांची वाहतूक करणारा कंटेनर जप्त केला. कंटेनरमध्ये ९४ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या १० हजार ८० किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थाळनेरला भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली, विटा एका खासगी बँकेच्या असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.
यासंदर्भात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार, २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या शिरपूर-चोपडा महामार्गावरील धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर थाळनेर पोलीस व महसूल विभागाचे पथक वाहनांची तपासणी करत असताना कंटेनर (एचआर ४७/ ई-३४८६) मध्ये चांदीच्या विटा मिळून आल्या. प्रत्येकी ३० किलो वजनाची एक याप्रमाणे एकूण १० हजार ८० किलो वजनाच्या ३३६ विटा कंटनेरमध्ये होत्या, चांदीच्या विटांची किंमत ९४ कोटी ६८ लाख रुपये आहे. कंटेनर थाळनेर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केला आहे. कंटेनर वाहनातील चांदी व कागदपत्रांची तपासणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी केली.
यामध्ये चांदीच्या विटा एका बँकेच्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोणतीही सुरक्षा न ठेवता विधानसभा निवडणुकीच्या दिवशीच चांदीच्या विटा मिळून आल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.