मुरुड: नागरिक व पर्यटकांनी मतदानाला प्राधान्य दिल्याने तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर निरव शांतता पाहायला मिळाली. तसेच येथील मासळी बाजारातही शुकशुकाट होता. मत्स्य विभागाकडून सर्व मच्छिमार बांधवांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले होते. शहरातील शाळा क्रमांक १ या मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. नवापाडा कोळीवाडा, बाजारपेठ, तांबट आळी, किनारा हॉटेल परिसर, जुना पाडा कोळीवाडा, सर एस. ए. हायस्कूल परिसरातील शहरी नागरिकांचे १२७८ एवढे मतदान होते. या केंद्रावर सकाळपासूनची गर्दी हटली नाही. मुरुड शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात महिला मतदानासाठी आलेल्या होत्या. मुरुड शहर व ग्रामीण प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात महिलांनी मोठी गर्दी केली होती.
तालुक्यातील शहर व ग्रामीण भागाचे मतदान ७० टक्के झाले होते. सायंकाळी ५ वाजता सुद्धा मतदान केंद्रावर विक्रमी गर्दी होती. त्यामुळे सायंकाळी ६ नंतर अखेरचे मतदान ८० टक्क्यांवर गेल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.