बापू मुळीक
पुरंदर : काळ राज्यभर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. राज्यातील विविध भागात सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अशातच पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ सद्या चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे आणि महायुतीकडून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहावयास मिळत आहे.
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ काल सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर 9:00 वाजता 4.28% मतदान झाले. 11 वाजता 14.44% मतदान झाले. मात्र त्यानंतर मतदानात अपेक्षित असा बदल होईल, असे वाटत असताना तसे काहीच झाले नाही. दुपारी एक वाजता 27.35%, असताना तीन वाजता 40.32%, मतदान झाले. यासाठी प्रमुख तीनही उमेदवारांना मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
पुरंदर हवेली मधील पुरुष 2,40,538 आणि महिला 2,23,446. तसेच इतर 33, असे एकूण 4,64,017 मतदार आहे. मतदानानंतर अंतिम आकडेवारी हाती आल्यावर सहा वाजता मतदान 61.02%, यामध्ये पुरुष 1,49,465 तर महिला 1,33,6 87 आणि इतर 6 असे एकूण 2,83,158 एवढे मतदान पुरंदर हवेली मतदारसंघात झाले. पुरंदर- हवेलीमध्ये विधानसभा निवडणुकीत सोळा उमेदवार असून यामध्ये कोण कोणाची मते घेतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मतदानाच्या दिवशी प्रामुख्याने ही निवडणूक विद्यमान आमदार संजय जगताप, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहावयास मिळत आहे. मतदानाच्या दिवशी पुरंदरमधील जिल्हा परिषद ,पंचायत समिती गणानुसार तीनही उमेदवारांचे पारडे जड असल्याचे अहवाल व सर्वे मधून दिसून आले आहे. तर हवेली मधील 16 गावात सुद्धा तीच परिस्थिती आहे. तीनही उमेदवारातच खरी लढत आहे.
जो उमेदवार हवेलीमधून आघाडी घेईल, तोच उमेदवार पुरंदरमध्ये कशा पद्धतीने आघाडी घेतो याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे तीनही उमेदवार यांच्यात खूप अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रत्येकाचीच धाकधूक लागून राहिलेली आहे. प्रामुख्याने हवेलीतील 16 गावातून जो उमेदवार मताधिक्य घेईल, तोच उमेदवार पुरंदर हवेली विधानसभेत बाजी मारणार हे मात्र नक्की आहे. आता तरी प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते सांगत आहे की, आमचाच उमेदवार आमदार होणार. परंतु, 23 तारखेलाच याबाबत सर्व कळणार आहे.