छत्रपती संभाजीनगर : लहान मुलासाठी छताच्या हुकाला बांधलेल्या झोक्याचा फास लागून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. १८) संध्याकाळी ७ वाजता महात्मा जोतिबा फुले सोसायटी, जटवाडा रोड भागात ही घटना घडली. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोमल प्रदीप गायकवाड (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. कोमल ही कॉलेजमध्ये शिकत होती. सोमवारी संध्याकाळी ती घराच्या वरील मजल्यावर गेली. तेथे तिचा पाय घसरून तोल गेला आणि ती लहान मुलासाठी बांधलेल्या झोक्यावर पडली. त्याच झोक्याचा तिला फास बसला. काही वेळाने तिची आई वरती गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास एएसआय सूर्यभान वाघ करीत आहेत.