नवी दिल्ली: रेल्वेच्या अनारक्षित म्हणजेच जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांकरिता खुशखबर आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत म्हणजेच पुढील दहा दिवसांत सुमारे ३७० रेल्वे गाड्यांना १,००० नवे जनरल डबे जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंडळाने बुधवारी दिली. या संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात जनरल डब्यांमधून प्रवास करणे आणखी सुलभ होणार आहे.
सणासुदीच्या काळात सामान्य
डब्यांतून प्रवास करणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असते. गेल्या काही वर्षांमध्ये एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरलचे डबे प्रवाशांनी खचाखच भरल्याचे पाहावयास मिळते. काही गाड्यांना तर इंजिनच्या मागे एक व सर्वात शेवटी एक असे दोनच जनरलचे डबे असतात. ही गैरसोय लक्षात घेता दररोज एक लाखाहून अधिक प्रवाशांना सुविधा देण्याच्या हेतूने नोव्हेंबर अखेरपर्यंत ३७० रेल्वे गाड्यांना १,००० नव्या जनरल कोच जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंडळाने दिली आहे.