श्रीरामपूर: दिवाळीनंतर थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी हिवाळ्यात वाढणारी अंड्यांची मागणी यंदादेखील वाढायला लागली आहे. परिणामी अंड्यांच्या दरात किरकोळ वाढ झालेली आहे; मात्र सध्या मका आणि सोया पेंडचे दर आटोक्यात असल्याने अंड्याचा उत्पादकता खर्च नियंत्रणात आहे. येत्या काळात मागणी वाढल्यास दरवाढ होण्याची अपेक्षा व्यावसायिकांना आहे.
वर्षभरातील विविध सण, उत्सवाच्या कालावधीत अंड्यांच्या मागणीत घट होते; मात्र थंडी सुरू होताच मागणीत मोठी वाढ होत असते. आताच थंडीला सुरुवात झाली असून येत्या महिन्यात मागणी आणखी वाढेल. परिणामी, दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. थंडीत शहरासह ग्रामीण भागातील अंड्यांना मोठी मागणी असते. सध्या अंड्यांना प्रति शेकडा ५७० रुपयांचा दर मिळत आहे. येत्या काळात दरवाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अंडे हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्रायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामुळे पुरुषांची ११ टक्के, तर स्त्रियांची १४ टक्के प्रोटिन्सची गरज भागते. एका अंड्यामधून ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’ आणि ‘डी’, रायबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस, ल्युटेन आणि कोलाइन यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो.
अंड्यामुळे शरीराची झीज भरून निघते आणि स्नायू बळकट होतात. वजन किवा कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही केवळ अंड्याचा पांढरा भाग खावा. अंड्याच्या पांढऱ्या भागात असणाऱ्या प्रोटिन्समुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. योग्य प्रकारे अंड खाल्ल्यास वजन घटण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार, नाष्ट्याला अंडे खाल्ल्यास बराच वेळ भूकेवर नियंत्रण राहाते.
थंडीत अंडे खाणे फायदेशीर
हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे गरजेचे असते आणि अंडे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते. त्यामुळष हिवाळ्यात अंडे खाण्याचा सल्ला अनेक आहार तज्जांकडून दिला जातो.
गावराण अंड्यांचेही चाहते
गावरान कोंबड्या खुल्या वातावरणात फिरतात. नैसर्गिक अन्न खातात, त्यामुळे त्यांच्या अंड्यांत पोषण मूल्ये जास्त प्रमाणात असतात. शिवाय गावराण अंड्यापासून बनविलेल्या पदार्थांना चवही चांगली असते. ग्रामीण भागातून शहरात विक्रीसाठी आलेल्या गावराण अंड्यांना जास्तीचे पैसे मोजायलाही लोक तयार असतात.