पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. २०) मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मतदानदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान पार पडत असून निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी 11 पर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये केवळ पुणे जिल्ह्याचा विचार केला, तर पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 15.64 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46 टक्के, तर सर्वाधिक 18.81 टक्के मतदान हे बारामतीत विधानसभा मतदारसंघात झाले आहे.
त्यामुळे बारामतीमध्ये मतदानाचा वाढता टक्का कोणत्या दादाला टेन्शन देणार, याची चर्चा आता सुरु झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात सरळ लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काट्याची लढाई पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सख्ख्या भावाचा मुलगा युगेंद्र पवार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात आहे. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांनाच आपला पाठिंबा दिला होता.