नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार बाचाबाची झाली आहे. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे सुहास कांदे समीर भुजबळांना संतापून म्हणाले. यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी आडवल्याचे पाहायला मिळाले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला असून दोन्ही गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी नांदगावच्या दोन उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. पोलीसांनी वेळीच त्यांना रोखले. सुहास कांदेंसोबतचे लोक मतदारसंघातीलच असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीसांनी दिली.